Accident | निरा-मोरगाव रोडवरील अपघातांची मालिका कायम; प्रशासनाचे दुर्लक्ष आणि खड्ड्यांमुळे पुन्हा एका निष्पाप जीवाचा बळी


पुरंदर रिपोर्टर  Live 

निरा |  प्रतिनिधी.

                          निरा-मोरगाव रोडवरील अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. काल रात्री नऊ वाजता कोळे वस्ती  जवळ भीषण अपघातात बबन कोंडीबा मोटे (रा. मोटेवस्ती) यांचा मृत्यू झाला. एमएच-०४ केएफ-३३४५ क्रमांकाच्या ट्रकने रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या मोटे यांना जोराची धडक दिली. या अपघातात ट्रकचे चाक त्यांच्या दोन्ही पायांवरून आणि हातावरून गेल्याने गंभीर जखमा होऊन पायांचा चेंदामेंदा झाला. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने पाहणाऱ्यांचा थरकाप उडाला.



              ग्रामस्थांनी तातडीने अपघात ग्रस्त व्यक्तीला प्रथम निरा, नंतर लोणंद व पुढे बारामती येथील गिरीराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र मध्यरात्री एक वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.


अपघातानंतर ट्रकचालक पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना युवकांनी पाठलाग करून त्याला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले.तसेच निरा पोलीस वेळीच दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. वैद्यकीय तपासणीत तो मद्यप्राशन केलेला असल्याचे स्पष्ट झाले.


गेल्या काही वर्षांपासून निरा-मोरगाव रोडची अवस्था दयनीय झाली असून रोडवरील मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू आहे. रात्रीची होणारी अवैध खनिज वाहतूक करणारे ट्रक मोठ्या वेगाने धावत असल्याने धोका अधिक वाढला आहे. याच ठिकाणी याआधी देखील एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर बकऱ्यांच्या कळपावर धडकून दोन बकऱ्यांचा मृत्यू झाला होता. गेल्या तीन महिन्यात या परिसरात तिन्ही अपघात घडून दोन जणांचा बळी तर वर्षभरात झालेल्या अपघातामध्ये अनेक जण जायबंदी झाले आहेत.


ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करून खड्डे बुजवण्याची, जागोजागी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली मात्र संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने हा हा रस्ता पादचारी व टू व्हीलर चालकांसाठी  मृत्यूचा सापळा बनला आहे 

 संबंधित प्रशासन कधी जागे होणार?

ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर बसवा, रोडवरील खड्डे तातडीने बुजवावेत अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments